जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागाच्या एका तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावर सही आणि शिक्का देण्यासाठी या तलाठ्याने चक्क बियर बारच्या बिलाची मागणी केली. नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्यावर त्याने अर्जावरील सही खोडून थेट अर्ज करणाऱ्या महिलेलाच बियर बारमध्ये बोलवण्याचा हट्ट धरला. या घटनेमुळे महसूल विभागातील गैरकारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी दोषी तलाठ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.