अखेर मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढत आहे. दरम्यान सोमवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तापमानातही घट झाली आहे.
कोकण, गोवा या भागात पुढील पाच दिवस, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या आणि मराठवाड्यात 30 जूनपासून पुढील पाच दिवस, विदर्भात 30 जून आणि 1 जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 जून आणि 1 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे येथील घाट विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात 29 ते 3 जुलै दरम्यान ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरीचा अंदाज आहे, मात्र सोमवारी पावसाचा जोर वाढेल.
ट्रेंडिंग बातमी - T-20 World Cup : ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला...11 वर्षांनी भारताला विजेतेपद; द. आफ्रिकेवर मात 7 धावांनी मात
वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपिर कारंजा, मालेगाव मानोरा, रिसोड सह अनेक ठिकाणी काल रात्री विजांच्या कडकडाटात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही ठिकाणी शेतातील अंकुरलेल्या कोवळ्या पिकांना पोषण मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाऊस पडल्यानं काही प्रमाणात रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.
सिंधुदुर्गात भातशेती पाण्याखाली...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागातील भातशेती पाण्याखाली गेल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली. या पावसामुळे शेतकरी पारंपरिक शेती करताना रमलेला दिसला. दुसरीकडे शेतकऱ्यांनी लावलेली भातशेती मुसळधार पावसाने पाण्याखाली गेलेली पहायला मिळाली. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.