संशयाचे भूत किती भीषण असू शकते, याचा प्रत्यय कल्याणमधील उंबर्डे परिसरात आला आहे. आपल्या नऊ वर्षांच्या चिमुरड्यासमोरच एका नराधम पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. या थरारानंतर आरोपी पतीने थेट नाशिक गाठून पोलिसांसमोर शरणागती पत्करली, तेव्हा या विदारक घटनेचा उलगडा झाला. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर असे मृत महिलेचे नाव असून, पती विशाल साहेबराव भुतकर याला पोलिसांनी अटक केलीय.