पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी झालेल्या मुसळधार आणि वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या काही तासांत पडलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सखल भाग पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी नद्यांसारखे दृश्य निर्माण झाले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गटारे आणि नाले तुंबल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले. साचलेल्या पाण्यात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.