भिवंडीत मुसळधार पावसामुळे धोकादायक ठरत असलेल्या नाले आणि नदीपात्रांमध्ये बुडण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे. मागील दोन दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देऊनगर परिसरातील १३ वर्षीय मोहम्मद अबुजर अन्सारी हा मुलगा मित्रांसोबत खेळत असताना काकूबाई चाळ परिसरातील नाल्यात तोल जाऊन पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मुलाचा शोध सुरू आहे. दरम्यान, कामवारी नदी आणि नाल्यांमध्ये बुडण्याच्या सलग तिसऱ्या घटनेमुळे भिवंडीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाकडून नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे