अकोल्यातील अकोला महानगरपालिका येथील स्थायी समिती सभागृहाचे ‘शहीदे वतन हजरत टिपू सुलतान’ हे नाव रद्द करून सर्वसमावेशक व वादमुक्त नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. सन २०१२ मध्ये तत्कालीन नगरसेवक तथा विद्यमान आमदार साजिद खान पठाण यांच्या मागणीनुसार हे नामकरण करण्यात आले असं निवेदनातून म्हटलं आहे. मात्र, टिपू सुलतान यांच्या नावावरून समाजात मतभेद निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दरम्यान माजी महापौर तथा भाजपचे विद्यमान नगरसेवक विजय अग्रवाल यांनी याप्रकरणी प्रशासनाने सुमोटो कारवाई करावी अशी मागणी केली. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी महापौर व आयुक्तांना निवेदन देत सर्वपक्षीय चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शहर प्रमुख गायकवाड यांनी म्हटलं आहे.