जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून आज अखेर पाणी सोडण्यात आले असून, यामुळे जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगाम तरी चांगला जावा, या आशेने शेतकरी पाण्याची प्रतीक्षा करत होते. अखेर जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी पहिल्या आवर्तनाला सुरुवात झाली आहे. या कालव्याद्वारे तब्बल एक लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, पुढील २५ दिवस हे पाणी सुरू राहणार असून, डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना मोठा आधार मिळणार आहे. पावसाने साथ सोडल्यानंतर चिंतेत असलेल्या बळीराजाला जायकवाडीच्या पाण्यामुळे आता काहीसा दिलासा मिळाला आहे.