दादरच्या कबुतरखान्यात मराठा संघटनांच्या आंदोलनाची बातमी. आज पोलिसांना निवेदन देण्यासाठी मराठी संघटना दादरमध्ये पोहोचल्या.पण मराठी संघटना दादरमध्ये पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केली. मराठी मुंबई एकीकरण संघटनेचे काही कार्यकर्ते कबुतरखान्याजवळ दाखल झाले.माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. 6 ऑगस्टला जैन समाजानं कबुतरखाना बचावासाठी आंदोलन केलं. चाकू हाती घेत महिलांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री अक्षरशः कापून काढल्या. कोर्टाच्या नियमांची पायमल्ली करत जैन आंदोलकांनी कबुतरांसाठी दान्यांच्या गोण्या ओतल्या. पण त्यावेळी पोलिसांनी एकाही आंदोलकाला ताब्यात घेतलं नाही.. एकाही आंदोलकाला पोलीस व्हॅनमध्ये टाकलं नाही. याउलट मंत्री मंगलप्रभात लोढांनी आंदोलक बाहेरचे असल्याचं सांगत कुणावरही कारवाई होणार नाही असं म्हटलं. शिवाय हाती शस्त्र घेऊ अशी भाषा करणाऱ्या जैनमुनींवरही कुठलीही कारवाई केलेली नाही.दरम्यान एकीकडे जैन समाजासाठी पोलिसांची बोटचेपी भूमिका आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना सर्रास उचलून व्हॅनमध्ये टाकलं जात असल्याची आजची भूमिका यामुळे पोलीस आणि सरकारची दुटप्पी भूमिका पाहायला मिळाली.