जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये RTO अधिकाऱ्यांच्या कारवाईलाच एका डंपरधारकाने आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहन तपासणी मोहिमेदरम्यान कारवाई करून जामनेर बसस्थानकाच्या आगारात जमा केलेला डंपर संबंधित धारकाने चक्क अधिकाऱ्यांसमोरून पळवून नेला. विशेष म्हणजे या डंपरला वाहन क्रमांक नसल्याने चेसिस क्रमांकाच्या आधारे त्याची माहिती मिळवून RTO अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. मात्र, कारवाई सुरू असतानाच डंपर पळवून नेण्यात आल्याने महिला RTO अधिकाऱ्यांसह पथकाची धावपळ उडाली. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे , संबंधित डंपरधारकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या डंपरचा वापर अवैध वाळू वाहतुकीसाठी होत होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.