नागपूरमध्ये 10 मे पासून पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट बंद; ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता

राज्यातील पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील सर्व पेट्रोल पंपांवर ऑनलाईन पेमेंट बंद होण्याची शक्यता आहे आणि याची सुरुवात नागपूरमधून होत आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार, १० मे २०२५ पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना. असोसिएशनचे म्हणणे आहे की, काही ऑनलाईन खात्यांमधून पेट्रोल पंप चालकांच्या खात्यात येणारे पेमेंट्स संशयास्पद ठरवून बँकांनी त्यांची लाखो रुपयांची रक्कम गोठवली आहे. काही गंभीर प्रकरणांमध्ये तर पंप चालकांची बँक खाती पूर्णपणे गोठवण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. असोसिएशनचे अमित गुप्ता यांनी सांगितले की, या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही कोणताही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे.

संबंधित व्हिडीओ