भाऊबीजेच्या निमित्ताने शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी तब्बल 91 लाख रुपयांची अनोखी भेट अर्पण करण्यात आली आहे. मुंबईतील एका साईभक्ताने 18 कॅरेट सोन्यापासून तयार केलेलं आकर्षक नक्षीकाम असलेलं सुवर्ण घड्याळ साईबाबांना भेट स्वरूपात दिलं आहे. या घड्याळाच्या निर्मितीसाठी 669 ग्रॅम सोने आणि 319 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ९१ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे हे सुवर्ण घड्याळ साईबाबांच्या समाधी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात बसवण्यात येणार आहे. दान करणाऱ्या साईभक्ताने आपली ओळख गोपनीय ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असून या अनोख्या भेटीची सध्या भाविकांमध्ये जोरदार चर्चा आहे.