एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच राज्याच्या काही भागात मात्र अवकाळी पावसाचाही तडाखा बसतोय. राज्यात मोठा वातावरणीय बदल होत असून अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे.. वादळवारा, गारपीटीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अशातच आता पुढील आठवड्याचे पहिले चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे... प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.