जपान येथे पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत ठाण्याचा नेमबाज रुद्रांक्ष हेमांगिनी बाळासाहेब पाटील याने दमदार कामगिरी करत भारताच्या शिरपेचात तीन पदकांची भर घातली आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारात त्याने रौप्य पदकासह वैयक्तिक कांस्य पदक मिळवले. तसेच 50 मीटर 3-पोझिशन प्रकारात सांघिक रौप्य पदकाची कमाई केली. एकाच आशियाई स्पर्धेत भारतासाठी तीन पदके मिळवणारा महाराष्ट्रातील शूटिंगमधील पहिला खेळाडू म्हणून रुद्रांक्षच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. त्याच्या या यशामुळे ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रुद्रांक्षच्या या उल्लेखनीय कामगिरीनंतर ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने आनंदनगर, ठाणे प्रवेशद्वार येथे त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात रुद्रांक्षचे स्वागत करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.