अहिल्यानगरात गोवंश जनावरे कापून रस्त्याच्या कडेला टाकल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. शहरातील कत्तलखाने बंद करावेत या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका दोन्ही आमदारांनी घेतली. यामुळे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.