भिवंडी तालुक्यातील नांदकर बापगाव रस्त्याची गेल्या तीन-चार वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून,या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतंय. खड्डे, उखडलेला रस्ता आणि खराब झालेल्या मार्गामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी,वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला तसेच असंख्य नागरिक नांदकरहून बापगाव आणि पुढे कल्याणच्या दिशेने प्रवास करतात.मात्र रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.दरम्यान, या रस्त्याची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास दर्शविणारा शाळकरी विद्यार्थिनींचा बाटलीचा मोबाईल करून मुलाखत घेण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.विद्यार्थिनींनी स्वतः रस्त्याची परिस्थिती दाखवत या मार्गामुळे प्रवास करताना होणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत. विद्यार्थिनींच्या या व्हिडिओमुळे आता प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विद्यार्थ्यांचा आवाज प्रशासनाच्या कानावर तरी पोहोचणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.