सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात एफडीएने मोठी कारवाई केली.गुजरातहून लक्झरी बसमधून असुरक्षित पद्धतीने आणलेला सुमारे 1200 किलो खवा आणि इतर खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. गुजरातहून अकोल्यात येणाऱ्या एका लक्झरी बसची तपासणी केली असता, बसच्या डिक्कीत मोठ्या प्रमाणात खवा आणि इतर खाद्यपदार्थ कोंबून आणल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे, या खाद्यपदार्थांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सुमारे 4 अंश सेल्सिअस तापमान राखणे आवश्यक असते.मात्र, कोणतीही योग्य शीतकरण व्यवस्था न करता हे पदार्थ लक्झरी बसच्या डिक्कीतून आणण्यात आल्याचे प्रशासनाच्या तपासणीत समोर आले. अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 1200 किलो खवा आणि इतर खाद्यपदार्थ जप्त केले असून, त्यांची अंदाजे किंमत 4 लाख रुपये असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे.