मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.अंतरवाली सराटी येथून बोलताना त्यांनी येत्या २९ ऑगस्टपासून शेवटचे आणि निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली.राज्यात सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्रे दिली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली.मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगत, २९ ऑगस्टला आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्या दिवशी मोठा लढा उभारणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणीचा पुनरुच्चार केला तसेच काही मंत्र्यांनी या मागणीला विरोध केल्याचाही आरोप केला.