मराठा आरक्षणाच्या नवीन जीआरवरून मराठा आरक्षण अभ्यासकांमध्येच मतमतांतरे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण जिंकलो आता दिवाळी साजरी करा म्हणणारे मनोज जरांगे देखील जीआरवर पूर्णपणे सहमत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जीआर काढल्यावर देखील जरांगेंकडून अभ्यासकांना बोलावले जात आहे. तर जरांगे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ विखे पाटील यांची भेट घेऊन जीआर मध्ये काही सुधारणा करण्यासाठी सूचना करणार आहेत. काही दस्तऐवज सादर करणार आहे. यासाठी ७ सप्टेंबर रोजी बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. तसेच प्रक्रिया राबवत असताना काही त्रुटी आढळल्या तर त्याही लगेच दूर केल्या जाणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईत सरकारने दिलेल्या जीआरवर जरांगेंचं पूर्णपणे समाधान झाले नसल्याचे बोलले जात आहे.