नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. काथर्दे खुर्द गावात किरकोळ वादातून ३५ वर्षीय मोघ्या भिल यांची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान जमावासमोर शड्डू ठोकल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला आणि त्याचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. गंभीर जखमी झालेल्या मोघ्या भिल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.