जळगाव रेल्वे स्टेशनवर चक्क आरपीएफची वर्दी घालून फिरणाऱ्या तोतया महिला पोलिसाचं पितळ उघड झालंय. धक्कादायक म्हणजे, लग्नासाठी मुलांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने या तरुणीने पोलिसांची वर्दी चढवल्याचं तपासात समोर आलंय. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला जळगाव रेल्वे स्टेशनवर आरपीएफकडून तपासणी सुरू होती. यावेळी आरपीएफची वर्दी घातलेली एक तरुणी संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. चौकशी केली असता तिने आपण नाशिक आरपीएफमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं. मात्र, तिच्याकडे ओळखपत्र नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. नाशिक आरपीएफकडून खातरजमा केली असता ही तरुणी पोलीसच नसल्याचं स्पष्ट झालं. चौकशीत ती जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवासी असल्याचं समोर आलं.