बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर एका १९ वर्षीय महिलेला गंभीर त्रास सुरू झाला आणि तपासणीत सीझर शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संध्या सूरज गायकवाड यांच्यावर १ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्या गंभीर अवस्थेत उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहेत. दरम्यान, या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.