अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजता अयोध्या येथील एका हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवलं असा आरोप खुद्द अजय राय यांनी केलाय. अजय राय यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे एक शिष्टमंडळ देणगी चोरीचा निषेध करण्यासाठी येथे आले होते. त्यांनी आज म्हणजेच मंगळवारी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा केली होती. त्यामुळे, ते रात्रीच अयोध्येला पोहोचले होते. त्यानंतर त्यांना अयोध्येतील हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप होतोय.