जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हवामान यंत्रात वादळी वाऱ्याची नोंद नसल्याचे कारण पुढे करत विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई नाकारल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हवामान यंत्रातील त्रुटीचा फटका शेतकऱ्यांना का बसावा, असा सवाल उपस्थित करत संतप्त केळी उत्पादकांनी सरकार आणि विमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.