नांदेड शहरात सततच्या पावसामुळे धक्कादायक घटना घडली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अचानक जमीन खचल्याने एक कार खड्ड्यात कोसळली. कार चालवत असलेले प्राध्यापक चंद्रशेखर येंगडे यांनी प्रसंगावधान राखत चालत्या गाडीतून बाहेर उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सततच्या पावसामुळे रस्त्याखालील भूभाग खचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने ही घटना स्वतंत्र रस्त्यावर घडल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.