पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचा शासन आदेश जारी केला आहे. जुलै महिन्यात 500 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या किंवा पाणी साचलेल्या भागातील बाधित कुटुंबांना ही मदत मिळणार आहे. पुरात कपडे आणि भांडी वाहून गेलेल्या कुटुंबांना 10 हजार रुपये, घराचे 25 टक्के नुकसान झाल्यास 25 हजार रुपये, 50 टक्के नुकसान झाल्यास 50 हजार रुपये, तर घर पूर्णपणे नष्ट झाल्यास दीड लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मदतीसाठी स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे आणि नुकसानीची पडताळणी केली जाणार असून त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत वितरित केली जाईल.