चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती. त्याचे पडसाद आता थेट विधिमंडळात उमटले आहेत. NDTV मराठीने उघड केलेल्या या धक्कादायक बातमीची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी नियम २६० अंतर्गत सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी सभागृहात सांगितले की, घोडणकप्पी येथील २५ वर्षीय संगीता गेडाम यांना प्रसूतीसाठी तब्बल १२ किलोमीटर उचलून न्यावे लागले. रस्त्याअभावी आणि रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने वाटेतच प्रसूती झाली आणि त्यानंतर अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच दुर्गम आदिवासी भागात तातडीने रस्ते, रुग्णवाहिका आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेविषयी अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी.