सोलापुरातील श्री सिद्धेश्वर तलावातील जलप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळच्या सुमारास अनेक मासे प्राणवायूसाठी तडफडताना दिसले, तर काही मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळले. तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवले होते आणि रसायनांचाही वापर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मासेमृत्यूच्या घटना थांबलेल्या नसल्याचं दिसून येत आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे महापालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी.