मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी थ्रिलर चित्रपटाची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘गोंधळ’ची निवड झाली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (FFI) ही अधिकृत घोषणा केली आहे. ‘गोंधळ’च्या ऑस्कर प्रवेशामुळे मराठी सिनेसृष्टीचं नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचलं आहे. मराठी भाषेतील चित्रपटांना आशय, मांडणी आणि प्रयोगशीलतेसाठी देशभरातून यापूर्वीही दाद मिळाली आहे. आता ‘गोंधळ’च्या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.