सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांत करण्यात आलेल्या ३६ कारवायांमध्ये तब्बल ५ कोटी ४० लाख १६ हजार ६२१ रुपयांचा भेसळयुक्त व संशयित खाद्यपदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून, सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.