धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातील 2 परिचारिकांना शीतपेयातून विषबाधा झालीय. पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर अशी त्यांची नावं आहेत. त्यातील पूजा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना लातूरमध्ये, तर पल्लवी सौदागर यांना अंबाजोगाई इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. महत्वाची बाब म्हणजे संत गजानन महाराजांची पालखी आज कळंब मुक्कामी आहे. या पालखीतील वारकऱ्यांना या शीतपेयांच्या बाटल्यांचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र, दोन नर्सना विषबाधा झाल्यानंतर या बाटल्या जप्त करण्यात आल्यात. अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. शीतपेयाच्या या बाटल्या कुठून आल्या आणि कोण त्याचं वाटप करणार होतं, याची माहिती घेतली जातेय.