सध्या मुंबईसह राज्यभरातल्या कबुतरखान्याचा विषय गाजतोय, नागरिकांच्या जीवावर उठलेली कबुतरं आणि या कबुतरांचे थवे जिथे विसावतात ते कबुतरखाने हटवावेत,माणसांच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर न्यावेत या सरकार आणि महानगरपालिकेच्या निर्णयाला जैन समाजाने विरोध केलाय. बरं निर्णयाला विरोध असणं, किंवा त्याचा विधायक मार्गाने निषेध करणं, त्याविरोधात आंदोलन करणं याला कुणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही, पण जर सरकारच्या या निर्णयावर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सारासार विचारांती शिक्कामोर्तब केलेलं असतानाही त्याचा विरोध करणं, शिवाय हा विरोध आक्रमकपणे करणं, प्रसंगी शस्त्र हातात घ्यावं लागलं तरी मागे हटणार नाही, अशा भाषेत विरोध करणं, हे कायद्याचं आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन तर आहेच पण ही कृती चिथावणीखोरही आहे. साधारण आठ दिवसांपुर्वी जैन समाजाने केलेल्या आक्रमक आंदोलनाला उत्तर म्हणून आज मराठी एकिकरण समितीच्या वतीनेही आज दादर कबुतर खाना परिसरात आंदोलनाचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यामुळे जैनांच्या आंदोलनाच्या वेळी बघ्याची भूमिका घेणारे पोलिस आज मराठी एकिकरण समितीच्या आंदोलनाच्या वेळी मात्र अॅक्शन मोडवर आले होते, यावरूनही टीका होतेय