राज्यातील काही भागांत दोन दिवसांपासून मध्यम ते हलक्या स्वरूपातील अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दाटलेल्या ढगांमुळे कमालसह किमान तापमानात वाढ झाली आहे.आज नाशिकसह जळगावला ‘ऑरेंज’, तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीला समोरे जावे लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे ईशान्येकडून नैऋत्याकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे याच्या संगमातून व त्यातून समुद्रसपाटीपासून महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. त्यामुळे प्रतितास ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.