पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरातील मंदार किवळे गोळीबार हल्ला प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात दौंड तालुक्यातील यवत पोलिसांना यश आले आहे.
प्रथमेश दीपक येणपुरे, वय १९ वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अंगझडतीमध्ये गावठी पिस्तुलासाठी वापरण्यात येणारी एक लोखंडी रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडेठाण गावात आरोपी लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार यवत पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.