अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांचं राजधानी रियाधमध्ये आगमन झालं. सौदी अरेबियात ते रशियाच्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं आता भेटीगाठींची मालिका सुरू झालीय. दोनच दिवसांपूर्वी उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांच्यासह रुबियो यांनी युक्रेनच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. यावेळी अध्यक्ष झेलेन्स्कीही उपस्थित होते. आता सौदीमध्ये मार्क रुबियो हे रशियन शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. मागच्याच आठवड्यात अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांचं पुतीन आणि झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून बोलणं झाल्यानंतर आता या भेटीगाठी सुरु झाल्यात. याचे संकेत खुद्द ट्रम्प यांनीही दिले होते. तर युक्रेनचं शिष्टमंडळही सौदीमध्ये सध्या उपस्थित आहे. झेलेन्स्कीही रियाधमध्ये दाखल झालेत. रशिया-अमेरिका बैठकीनंतर युक्रेन आणि रशिया यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीनं बैठक होते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.